Thursday, 30 June 2022

कबड्डी

 कबड्डी


---------------------------------


कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते.


पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. ,


महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच


किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.


 असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.




क्रिडांगणाविषयी माहिती


-----------------------------------


अ) पुरुष व कुमार गट मुले यांच्यासाठी


1. क्रिडांगणाची रुंदी 10 मी. व लांबी 13 मी. असते.


2. मध्यरेषा 6.50 मीटरवर असते.


3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. असते.


4. निदानरेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3.50 मीटर अंतरावर असते.



 

5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.


6. सिटींग बॉक्स 8 मी X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.


-----------------------------------


ब) महिला व कुमारी मुली यांच्यासाठी


1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 12 मी. असते.


2. मध्यरेषा 6 मीटरवर असते.


3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.


4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3 मीटर अंतरावर असते.


5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.



 

6. सिटींग बॉक्स 6 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.


----------------------------------


क) किशोर मुले व किशोरी मुली यांच्यासाठी


1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 11 मी. असते.


2. मध्यरेषा 5.50 मीटरवर असते.


3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.


4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 2.50 मीटर अंतरावर असते.


5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.


6. सिटींग बॉक्स 4 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.


 ---------------------------------


खेळांचे नियम


1)नाणेफेक जिंकणारा संघ “अंगण’ किंवा “चढाई’ यापैकी निवड करतो. दुस-या डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरु करतात. त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई संघाने केलेली नसते तो संघ चढाई करतो.


2) चढाई करणा-याने “कबड्‌डी’ हा उचार स्पष्टपणे आणि सलग केला पाहिजे. तसे न आढळल्यास पंचाने अथवा सरपंचाने त्याला ताकीद देऊन विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी. त्यावेळी पाठलाग करता येणार नाही.



 

3) चढाई करणा-याने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी तसे न आढळल्यास पंचांनी विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी.


4) खेळ चालू असताना खेळाडूचा कोणताही भाग अंतिम मर्यादेबाहेर जाऊ नये तसा गेल्यास तो बाद ठरविला जाईल. पण झटापटीच्या वेळी तसे असल्यास तो खेळाडू बाद नसतो. अशा वेळेस शरीराचा कोणताही भाग आत असला तरी चालतो.


5) झटापट सुरु झाल्यास राखीव क्षेत्राच्या क्रीडाक्षेत्रात समावेश होतो. झटापट संपल्यावर खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात परत जाताना राखीव क्षेत्राचा उपयोग करता येतो.


6) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम रेषेबाहेर गेल्यास त्याला पंचांनी बाहेर काढावे.


7) ताकीद देऊनही खेळाडू आपल्या अंगणात दम घालवल्यास वा “कबड्डी’ शब्द उच्चारण्यास सुरुवात करत नसेल तर त्याला बाद न देता त्याची चढाईची पाळी संपली असे जाहीर करुन विरुध्द संघाला एक गुण द्यावा.


8 ) चढाई करणारा आपल्या अंगणात गेल्यावर अथवा बाद झाल्यानंतर प्रतिपक्षाने पाच सेकंदात आपला खेळाडू चढाईसाठी पाठवावा.


9) चढाई करणारा आक्रमक खेळाडू बचाव करणाऱ्या खेळाडूला स्पर्श करुन आपल्या अंगणात परत जात असताना त्याला पाठलाग करता येईल परंतु चढाई करणारा पकडीतून सुटून जात असेल अशा वेळी मात्र त्याचा पाठलाग करता येणार नाही.


10) चढाई करणा-या खेळाडूच्याविरुध्द अंगणात दम गेल्यास तो बाद ठरविला जाईल.



 

11) चढाई करणारा बचाव करणा-या एक किंवा अधिक खेळाडूंना केवळ स्पर्श करुन जात असेल तर त्याचा पाठलाग करता येईल.


12) एकावेळी एकापेक्षा जास्त खेळाडूंनी चढाई केल्यास ती ग्राह्य न मानता प्रतिस्पर्धी संघास चढाईची संधी दिली जाते.


13) वारंवार सूचना देऊन एकापेक्षा जास्त खेळाडूंची चढाईस जात असतील तर पंचांनी प्रथम गेलेल्या खेळाडूखंरीज बाकी सर्व खेळाडूंना बाद ठरवावे.


14) हेतूपुरस्पर चढाई करणा-या खेळाडूचा दम घालवणे अथवा कैची अथवा अयोग्य पकड करुन चढाई करणा-यास दुखापत करणे या गोष्टी दिसल्यास पंचांनी चढाई करणा-या खेळाडूस नाबाद ठरवावे.


15) बचाव करणा-या खेळाडूने चढाई करणा-या खेळाडूला अंतिम मर्यादेपर्यंत ढकलू नये अथवा चढाई करणा-या खेळाडूने बचाव करणा-या खेळाडूला बाहेर ओढू नये. तसे बुध्दीपुरस्सर करणा-या खेळाडूस बाद घोषित करावे.


16) चढाई पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चढाई करणारा आपल्या अंगणात जाईपर्यंत बचाव करणा-या खेळाडूपैकी कुणीही मध्यरेषा ओलांडू नये तसे केल्यास त्या खेळाडूला बाद दिले जाईल.


17) चढाई सुरु करताना बचाव करणा-या खेळाडूने मध्यरेषेला स्पर्श करुन त्या चढाई करणा-यास पकडले अथवा मदत केली तर बचाव करणारा बाद होईल.


18) जो संघ लोण करेल त्या संघास दोन गुण मिळतात. लोण झाल्यावर दहा सेकंदात सर्व संघ परत मैदानात आला नाही तर प्रतिपक्षास एक गुण द्यावा. तसे करुनही जर संघ मैदानात येत नसेल तर तो प्रत्येक पाच सेकंदाला एक याप्रमाणे सामन्याचा वेळ संपेपर्यंत गुण देत राहतील.


19) वारंवार पाळी नसताना एखादा खेळाडू चढाईस जात असेल तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण द्यावा.


20) चढाई करणा-या खेळाडूस सूचना अथवा जागृत करण्याचा जर प्रयत्न केला गेलातर प्रतिस्पर्धी संघास गुण द्यावा.


21) प्रतिपक्षाचा एक खेळाडू बाद झाल्यास एक खेळाडू आत येतो.


22) पंच किंवा सरपंचाने एखाद्या संघाला वारंवार गुण दिल्यास त्या संघाला फक्त गुण मिळतात. पण त्यांचे बाद असलेले खेळाडू उठू शकत नाहीत.


23) कोणत्याही अडथळ्याने सामना बंद पडला व तो 20 मिनिटांच्या आत सुरु झाल्यास सामना उरलेल्या वेळ तेच खेळाडू व त्याच गुणसंख्येवर खेळवावा. मात्र त्यानंतर सुरु होत असल्यास सामना सुरुवातीपासून खेळवावा. त्यावेळी पूर्वीचेच खेळाडू असावेत असे बंधन नाही.


24) निलंबित वा बडतर्फ खेळाडूसाठी बदली खेळाडू घेता येणार नाही. तसेच निलंबीत वा बडतर्फ करण्याचे कमी झालेल्या खेळाडूंची संख्या असताना बोनस रेषेचा नियम लागू होईल. तसेच लोण झाल्यास कमी असलेल्या खेळाडूच्या संख्येइतके गुण, अधिक दोन गुण दिले जातील.


वयोमर्यादा व वजन वयोमर्यादा व वजन


---------------------------


पुरुष - 80 किलो वजन व वयोमर्यादा नाही


महिला गट - 70 किलो वजन व वयोमर्यादा नाही




कुमारी गट मुली – 60 किलो वजन व वय 20 वर्षे


कुमार गट मुले – 65 किलो वजन व वय 20 वर्षे




किशोरी गट मुली – 50 किलो वजन व वय 16 वर्षे


किशोर गट मुले – 50 किलो वजन व वय 16 वर्षे


--------------------------------


कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक भिडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.


महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.


------------------------------



No comments:

Post a Comment